Monday, October 5, 2020

विदारकता

 एक निर्भया मागे पडली आणि हाथरसने पुन्हा डोळे उघडले, हैदराबाद मध्ये झालेली घटना ताजी असताना पुन्हा हृदयाला हेलकावे घालायला लावणारी घटना ही नक्कीच दुर्दैवी आणि घृणास्पद आहे. अखिल स्त्रीजाती ही मातृस्वरुप असून तीला आदर न दिल्यामुळे प्रत्यक्ष इंद्रालाही इंद्रपद सोडावे लागले होते, याचा काहीसा विसर भारतात दिसून येतोय. ज्या ठिकाणी नारीला परमेश्वर म्हणून पूजातात , प्रकृती आणि पुरूष अशा अविभाज्य गोष्टींबाबत बोलल जात, तेथिल हे दृष्य नक्कीच चिंताजनक आहे.


पण चिंतेची बाब मुळी ही वाटत नसून, आपल्या राजकीय फायद्यासाठी करत असलेल्या चांडाळकृतींची आहे. कारण याही स्थितीत आपली राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने बरेच जणांनी आपले हात सज्ज केले आहेत. पण या भारतामध्ये कृप, भीष्म यांनी जरी नारी अपमानात भाग घेतला नसेल, तरी ते शांत पहात बसले एखाद्या निर्जिवाप्रमाणे म्हणून त्याना पण या शासनाचा भाग व्हावा लागलेला. सध्या तीच आपली स्थिती आहे.


इतिहासात ज्याप्रमाणे देवगिरी निर्धास्तपणे आपल्या पूजा अर्चनेत गुंतलेला होता, ज्यावेळी खिल्जीने चितोडगड पादाक्रांत केला, तशीच आपली अवस्था आहे. आपण पूजा अर्चनेत नक्कीच नाही, तर आपण एक गलिच्छ राजाकारणाचा भाग बनून बसलोय. कोणतीही गोष्ट चूक अथवा बरोबर हे देखील आंम्हाला कोणी दुसरा सांगायला लागवा, एवढी आमची बुद्धी दास्यत्वाच्या अधिन केव्हा झाली हे कळले पण नाही. आज दिल्ली, हैदराबाद किंवा हाथरसची घटना ,परवा जर आपल्या जवळ घडली तर पुन्हा एकदा न्यायदेवतेच्या गाभा-यात दरवाजा ठोठवायला जायची वाट का बघावी? आणि किती वेळ बघावी? पुन्हा चितोडगडवर आलेला अल्लाउद्दीन महाराष्ट्रात कधी येतो याची वाट बघत बसावी  की सज्ज करावी आपली सेना, हा पेच पुन्हा देवगिरीच्या रामदेवसमोर पडवा हेच दुर्भाग्य... 


छत्रपती हे देखिल नावापुरते ठेवलेला समाज, त्यांच्या विचारांवर कधी चालेल हे समजणे मुळी कर्मकठीण आणि जर ते झाले नाही तर छत्रपती कदाचित देवत्त्वाला पोहचतील पण त्यांचे विचारमात्र रोज पायदळी तुडवले जातील. लहान वयात रामायण ,महाभारत सांगून स्त्रीबद्दलचा जो आदर जिजामातांनी शिवाबांच्या मनात निर्माण केला, तोच आदर या वाहिन्यांवरील मालिकांच्या विदारक दृष्टीकोनमुळे सध्याची आई देण्यास असमर्थ आहे, हेच दु:ख आहे. मुळात एखाद्या मुलीच्या फोटोखाली गलिच्छ टिप्पणी करण, हीच या गोष्टीत सुरुवात होणारी किड आहे.ज्या संस्कृतीची विशालमुळे जगात खोलवर गेलीत त्याला लागलेली ही वाळवी जर नष्ट केली नसेल तर खूप धोक्याच होऊन बसेल.


समाज शिक्षांनी सुधारण्यापेक्षा यथोचित शिक्षणाने व संस्कारानेच सुधारेल.

-विविवा

Monday, April 13, 2020


या विलगीकरणाच्या काळात दुरदर्शन वर सुरु झालेली जुनी 'रामायण' ही मालिका परत नवीन विक्रम करत आहे, तर तिकडे प्रत्येकाच्या स्टेटसला रामायणाचे काही प्रसंग झळकताना दिसतात, ब-याच वेळा आपल्या संस्कृतीच्या मोठेपणामुळे छाती अभिमानाने भरुन येते. कारण आदर्शाच दर्शन घडवणार रामायण कोणत्याही काळात तेवढचं वंदनीय असणार याबाबत शंका नाही.

पण याच स्टेटस मधील एका प्रसंगाने मात्र मनात संभ्रम निर्माण केला की हे खरच आदर्श आहे का, कारण कौशल्य हे योग्य निवडण्यात असतं हे आज जणू सारे लोक विसरुन गेलेत, याची प्रचिती आली. कारण अनेक शालेय, महाविद्यालयीन व युवक मित्रानी म्हणे 'महाबली कुंभकर्णा' चा आदर्श घेतला. थोडक्यात काय तर आपली योग्यता म्हणजे लायकी दाखवायचा प्रयत्न केला आणि बरं या महाबली कडून नेमकं झोपण्याचे धडे घेतले, आणि आपल्याकडे खादाड म्हणजे बकासुर आणि झोपाळू म्हणजे कुंभकर्ण म्हणायचा पायदंडा आहे मुळी, कोणत्याही गोष्टीचे कारण शोधणे व त्याचा अभ्यास करते हे मुळी आपल्याला ठावूक नाही अथवा शिकवले नसेल.

तर महाविष्णुंचे दोन द्वारपाल 'जय' आणि 'विजय ' हे एका शापाने 'रावण' व 'कुंभकर्ण' झाले (शाप व शापाची पार्श्वभूमीची इकडे जरुरत वाटत नाही) . तर ब्राह्मण कुळात जन्माला आलेले हे भाऊ मातृकुळामुळे राक्षस म्हणून गणले गेले. वेदांचे पठण केलेल्या या भावांनी ब्रम्हदेवाना प्रसन्न करून घेतल आणि कुंभकर्णाचं मन पाहून देवानी सरस्वती मातेकरवी हा त्याच्या तोंडून वर वदवून घेतला 'इंद्रासन' च झाल 'निद्रासन' आणि आमच्या नेटक-यानी नेमकी तीच गोष्ट उचलून धरली.

पण स्वत:च्या मोठ्या भावाला  हा अधर्म नको म्हणून सांगणारा, आपला भाऊ जरी अयोग्य असला तरी भरत व लक्ष्मणासारखा पाठीशी खंबीर उभा राहणारा भाऊ, संकटाच्या वेळी देशाशी व कुळाशी प्रामाणिक राहणारा योद्धा म्हणजे महाबली कुंभकर्ण. केवळ एखाद्याचे वाईट गुण प्रकर्शात आणून त्याच्या चांगल्या गुणांवर काळोखी आणणे हे कधीही धर्मसंमत नाही. जर  आपल्या आदर्शांचे असे लचके तोडले गेले तर, आपली हीच गौरववान, जाज्वल्य,  उज्जवल अशी संस्कृती कोणाच्या तोंडावर बघेल?
जरा विचार बदला, आचार बदला, देश आपोआप बदलेल.
||जय भारत||    ||जय श्रीराम||

-विश्वनाथ विश्वंभर वालावलकर

Wednesday, April 8, 2020


मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रीयं बुध्दिमतां वरिष्ठम् |
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ||

     अनुष्टुप छंदामध्ये बुधकौशिक ॠषी यांनी रामरक्षा या स्तोत्रात केलेले हे हनुमान यांचे वर्णन आढळते. वायुप्रमाणे गतीमान व ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला असा कपिश्रेष्ठ म्हणजे रामभक्त हनुमान असे काहीसे हे वर्णन आहे.
     आजपर्यंत खुप वेळा खुप ठिकाणी मारुति राया यांचा विविध ठिकाणी उल्लेख आठळतो. जे सहा चिरंजीव सांगितले जातात त्यामध्ये देखिल मारुति रायांचे एक नाव सापडते. स्वत:च्या अपरिमित शक्तिसाठी व शौर्यासाठी मारुतिराया यांचे महत्व विशेष मानले जातात. रावणाच्या अपरिमित साम्राज्यातून अत्यंत कुशलतेने सीतामातेचा शोध यांनी केला व आदर्श भक्ताचे उदाहरण घालून दिले.केवळ भक्ति भावनने पाहिले जाणारे हे मारूती रूप ज्यांनी बदलले व पुराणतील मारुति राया नियमित जीवनात उतरवले ते म्हणजे ज्याना मारुति चे अवतार मानले जाते ते म्हणजे राम नामाची पताका हातात घेऊन अखंड भारतभर शक्तिच्या उपासनीची सुरुवात करणारे समर्थ रामदास स्वामी होय.
        हनुमान जयंती च्या शुभ मुहूर्तावर या समर्थांच्या कार्यावर प्रकाश टाकून शक्ति ची उपासना आता सुरु करणे हे खरे हनुमान जयंती चे सार्थक म्हणू शकतो.
भारतभर मारुति मंदिर स्थापन करुन शक्तिची पूजा समर्थानी सुरु केली. याचे कारण येवढेच होते की समर्थाना एक सबल आणि समृद्ध राष्ट्राची अपेक्षा होती, ज्यासाठी एक समर्थ आणि शक्तिने युक्त असलेल्या नविन पीढीची गरज होती, म्हणून शक्ति उपासना सुरु झाली.ज्या शक्ति उपासनेमध्ये सूर्यनमस्कारांना विशेष महत्व होते, कारण स्वत: समर्थ १२०० सूर्यनमस्कार घालत.
      आणि आजही हे विचार तेवढेच महत्वपूर्ण आहेत जेवढे त्यावेळी होते, कारण सगळ्या गोष्टी केवळ मजेतआणि हसण्यात घेणा-या या पीढीने प्रत्येक उत्सव त्याच महत्व शास्त्र समजून घेऊन ते साजरे करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण अज्ञानाच्या स्वैर सागरात बुढणारी  ही ज्ञानरूपी नौका पुन्हा किनारी लावायची असेल तर आपणास आपली पुराणातील सुधारीत गलबत घेऊन पुन्हा उतरावे लागणार. कारण "शास्त्र" हे दुधारी शस्त्र आहे , ज्याचा वापर महत्वचा आहे आणि आपणास तेच समजल पाहीजे.
       शक्ति आणि बुद्धि यांचा एकत्रित मेळ असलेल्या मारुती रायांचे स्मरण करुन पुन्हा एकदा ही पवित्र भूमी सुजलाम् सुफलाम् करण्याचा संकल्प आपण सोडूया हेच योग्य ठरेल.
||जय श्रीराम||  ||जय भारत||

-
विश्वनाथ विश्वंभर वालावलकर